Sunday, December 22, 2019

My Quest शोधतो मी


शोधतो मी


काळ ना करू शके सैल
असे नाते शोधतो मी
 जे सुखे नेई तीरी पैल
त्या गलबताते शोधतो मी

देऊनी ना रिते होती
असे दाते शोधतो मी
आभा  पेलून अकर्ते जे
ते कर्ते करवते शोधतो मी      
                     
न सांगता  कळे सारे
ते हसू खुलते शोधतो मी
अन आरपार जाई छेदून
ते नजरपाते शोधतो मी

जीव जावा रंगी रंगुन
इंद्रधनु ते शोधतो मी
असुर सुद्धा होती सुरमय
सुरम्य  गीते शोधतो मी

सुखदुःख  नित आवर्तने
ना कंपते ते शोधतो मी
शांत सहज कल्लोळ ज्याचे
त्या आनंद प्रपाते शोधतो मी

ओथंबून घन जिथे रेलती
त्या नभाते शोधतो मी अन
घन भेदून जे सूर्य पाहते
ते तृणपाते शोधतो मी

 जिथे जाता लागे परतू
 त्या घराते शोधतो मी
 मी ही सरावे सशरीरे
 रे मना ते शोधतो मी

आदी ज्याचा अंत कळता
व्यक्त मध्याते  शोधतो मी                     
जिच्या स्तव हे जनन मरण
अशा माते शोधतो मी    

….नरेंद्र

No comments:

Post a Comment